सांची संघारामातील स्तूप क्रं. ३ हा धम्मसेनापतींचे धातूअवशेष २२०० वर्ष सांभाळून ठेवणारा महत्वपूर्ण स्तूप आहे.
सांची येथे अलेक्झांडर कनिंगहम व फेड्रिक मैसी यांच्याद्वारे उत्खनन सुरू असताना स्तूप क्रं. ३ च्या दक्षिण बाजूला एक व उत्तर बाजूला एक अश्या दोन दगडी पेट्या सापडल्या ज्यावर सारिपुतस व महामोगलानस असे शब्द ब्राह्मी लिपि व पालि भाषेत कोरलेले आढळून आले. या वरुन हे धातूअवशेष भगवान बुद्धांचे धम्मसेनापती सारिपुत्त व महामोग्गलान यांचे आहेत हे स्पष्ट झाले.
बौद्ध सिद्धांतानुसार कनिंगहम व मैसी या विद्वानांनी असा तर्क लावला की भगवान बुद्ध नेहमी पूर्वाभिमुख होउन ध्यान व उपदेश करीत असत. सांचीचा मुख्य स्तूप हा भगवान बुद्धांचे प्रतीक आहे तर बौद्ध वाङमयानुसार सारिपुत्त हे भगवान बुद्धांचे उजवे व महामोग्गलान हे डावे हात म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यांचे धातूआशेष सुद्धा मुख्य स्तूपासमोरच्या स्तूपात उजव्या व डाव्या बाजूला प्राप्त झालेत.
या धातूअवशेषांसोबत सोबत सतधारा येथेही सारिपुत्त – महामोग्गलान यांचे धातूअवशेष प्राप्त झाले ज्यांना १८६६ साली विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम, इंग्लंड मध्ये ठेवण्यासाठी बोटीने पाठविण्यात आले. त्यापैकी एक बोट ज्यात सांचीचे धातूअवशेष होते त्या बोटीला अपघात होउन ती बोट बुडाली व सांचीचे धम्मसेनापतींचे धातूअवशेष समुद्रात विलीन झाले.
आज जे धातुअवशेष आपण चेतीयगिरी विहारात पाहतो त्या सतधारा येथील स्तूपातून प्राप्त झालेले धातूअवशेष आहेत जे महाबोधि सोसायटीच्या प्रयत्नाने १९४७ साली श्रीलंका सरकारद्वारे पुन्हा प्राप्त करण्यात आले.
प्रत्येक वर्षी नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी सांची महोत्सवात या धातूअवशेषांची श्रीलंका व मध्यप्रदेश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने मिरवणूक काढण्यात येते.
अरविंद भंडारे
अध्यक्ष, पालि रिसर्च इन्स्टिट्यूट, मुंबई
२९/१०/२०२०
0 Comments