Wednesday, April 7, 2021

भारतीय रिझर्व बँकेचे जनक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 महात्मा गांधी देशाच्या संविधान निर्मितीच्या अगोदर आपल्या सहकार्यांशी बोलताना म्हणतात, "भारत देशाचे संपूर्ण अर्थकारण, राजकारण, समाजकारण, इतिहास, भाषावार प्रांतरचना विश्लेषण, भौगोलिक रचना, भारतीय व्यापार, शेती,भारतीय कामगारांचे प्रश्न या विविध बाबतींची सखोल माहिती जर कोणाला असेल तर ते डॉ.आंबेडकर हे आहेत. संविधान निर्मितीसाठी त्यांच्यासारखा विद्वान पंडित कोणी नाही. म्हणून कोणत्याही परिस्थितीत डॉ.आंबेडकरांना संविधान समिती मध्ये निवडून आणा."

आर्थिक विकासासंदर्भात डॉ.आंबेडकर यांच्या मते, अल्पभूधारकांवर आधारित भारतीय शेतीची उत्पादकता व उत्पन्न कमी असण्याचे मुख्य कारण शेतीमधील अल्प भांडवली गुंतवणूक हे आहे. फक्त शेतीच नव्हे तर कामगारांचे आर्थिक धोरण यावर सुद्धा त्यांनी विस्तृत विचार मांडणी केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील संपुर्ण घटकांचा विश्लेषणात्मक अभ्यास केला होता. त्यात भारतीय अर्थव्यवस्था व त्यावरील समस्यांचे उपाय यावर त्यांनी जागतिक दर्जाच्या तीन पदव्या प्राप्त केल्या.



अर्थशास्त्रावर तीन विद्वत्तापूर्ण प्रबंध कोलंबिया(अमेरिका) व लंडन विद्यापीठाला एम.ए. पीएचडी, व डीएस्सी, साठी सादर केले आणि विशेष म्हणजे पुढे तीनही प्रबंध पुस्तक रूपाने प्रकाशित करण्यात आले.
१.(Administration and Finance of the East India Company) - ईस्ट इंडिया कंपनी:प्रशासन आणि वित्तप्रणाली यात इ.स.१७९२ ते १८५८ या कालखंडातील ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराचा ऐतिहासिक आढावा, ज्यात ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली भारतीयांना कशा हालअपेष्टा भोगाव्या लागल्या त्यावर परखड भाष्य डॉ.आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे.
२.(The Evolution of Provincial Finance in British India) - ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्ताची उत्क्रांती यामध्ये प्रामुख्याने इ.स.१८३३ ते १९२१ या कालखंडातील ब्रिटिश भारतातील केंद्र शासन व घटक राज्ये यांच्यातील आर्थिक संबंधाचे चिकित्सक विश्लेषण जे केंद्र आणि राज्याच्या आर्थिक संबंधाच्या बाबतीत महत्वपूर्ण आहे.
३.(The problem of the Rupee: its origin and Its Solution) - भारतीय रुपयाचा प्रश्न:उद्गम आणि उपाय या प्रबंधात भारतीय अर्थव्यवस्थेच्या घडीसाठी उपाययोजना बाबतीत अतिशय सूक्ष्म आणि चिकिस्तक पद्धतीने मांडणी केली आहे. 'भारतासाठी सुयोग्य चलन पद्धती कोणती?' आर्थिक धोरणे या व त्या काळाच्या गहन प्रश्नांची चर्चा करणारा अत्यंत मौलिक असा अर्थशास्त्रीय दस्तावेज आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या स्थापनेत नेमके काय योगदान आहे हे महत्वाचे आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आणि सुधारणा करण्यासाठी १९२४-२५ मध्ये ब्रिटिश सरकारने रॉयल समिती नेमली होती. त्यालाच ( Hilton Young Commission) असेही म्हटले जाते. या समितीकडून अर्थव्यवस्थेवर बोलण्यासाठी डॉ.आंबेडकरांना आमंत्रित केले होते. आणि विशेष म्हणजे त्या समितीतील प्रत्येक सभासदांकडे (The problem of the Rupee) हे पुस्तक होते. भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी प्रत्येक सभासद हा या पुस्तकाचा संदर्भ म्हणून उपयोग करू पाहत होता. हे पाहून डॉ.आंबेडकर हर्षित झाले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर या समितीसमोर भारतीय चलनात असलेल्या अडचणी व त्यावरील उपाय, बँकिंग कार्यपद्धती कशी असावी, वित्तीय धोरण, चलनाचा मापदंड काय असावा,सामूहिक शेतीव्यवसाय,
आर्थिक धोरण, जमीनदारी पद्धती, जमीन कर या सर्वांचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम,सर्वात महत्वाचे चलन विनिमय व्यवस्थेत 'सोने' हा मापदंड मानला पाहिजे असे त्यांनी ठासून सांगितले.
पहिल्या महायुद्धानंतर १९३५ साली ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेली भारतीय अर्थव्यवस्था सुरळीत चालू राहावी, म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक स्थापन करण्याचे ठरले. आणि ही बँक (Hilton Young Commission) या समितीच्या तपशील लक्षात घेऊन स्थापन करण्यात आली.बाबासाहेबांनी लिहलेल्या वरील तीनही पुस्तक प्रबंधाचा उपयोग हा 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या' स्थापनेचा पाया ठरला. आणि ही मध्यवर्ती बँक अस्तित्वात आली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुचवलेले मार्गदर्शक तत्वे आणि कार्यप्रणाली यावर आजही ही बँक तटस्थ उभी आहे. १ एप्रिल १९३५ मध्ये बँकेची स्थापना करण्यात आली खरी मात्र १९४९ मध्ये ही खऱ्या अर्थाने भारतीयांच्या ताब्यात घेण्यात आली.
बाबासाहेब हे किती महान अर्थशास्त्रज्ञ होते हे यावरून लक्षात येईल.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ साली ५०० व १००० रू.च्या नोटांचे विमुद्रीकरण केले. ही मूळ संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या (Problem of the Rupee) या पुस्तक प्रबंधामधून घेण्यात आली होती.
सेवायोजन कार्यालयांची(Employment Exchange) ची स्थापना, (Skill Development) ची पायाभरणी याचे संपूर्ण श्रेय डॉ.आंबेडकरांना जाते. त्यांच्यामुळेच ही भारताला देणगी लाभलेली आहे.
"भारताचे महान अर्थशास्त्रज्ञ डॉ.अमर्त्य सेन ज्यांना अर्थशास्त्रामध्ये ' नोबेल पारितोषिक' मिळाले आहे ते असे म्हणतात.
"डॉ.आंबेडकर हे अर्थशास्त्रात माझे वडील आहेत. त्यांच्याऐवढा जागतिक कीर्तीचा महान अर्थशास्त्रज्ञ होणे नाही."
लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स, विद्यापीठात डॉ.आंबेडकरांचा पुतळा बसविण्यात आला आहे. त्याचबरोबर 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन' देखील चालू करण्यात आले आहे.
जगाने बाबासाहेबांचा खूप मोठा यथोचित सन्मान केला. मात्र भारताने RBI बँकेच्या स्थापनेपाठीमागील सर्वात महान योगदान बाबासाहेबांचे असताना त्यांचा पाहिजे तेवढा सन्मान केला नाही. भारतासाठी ही फार मोठी दुर्दैवी बाब आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.
Via मूकनायक - Muknayak

No comments:

Post a Comment

हिंदु कोड बिल: लव यु बाबासाहेब!

  यु बाबासाहेब " बाबासाहेब दिल्लीवरून नेहरूंची तार आली आहे ते म्हणतायेत की, हिंदू कोड बिल ला देशात सर्वत्र विरोध सुरू आहे. त्यामुळे हे...