Thursday, January 21, 2021

आपल्या मुलांना यशस्वी बनवायचे असेल तर बाबासाहेबांचे 'विद्यार्थ्यांनो जागृत व्हा' हे भाषण जरूर वाचा !


 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशुन केलेले भाषण !

"विध्यार्थी दशेत कसे वागावे याबाबत मी स्वानुभवाने काहींना काही सांगु शकेन. ज्या समाजात हजारो वर्ष पावेतो   कसलेही शिक्षण न्हवते. त्या समाजातील पुष्कळ लोक अलीकडे बी. ए. व एम. ए. वगैरे विद्यापीठाच्या पदव्या घेऊन बाहेर पडताना पाहून कोणास समाधान वाटणार नाही ? 


तुम्ही जे शिक्षण घेता ते असे घ्या त्यामुळे आपले सर्व विद्यार्थी सरस झाले पाहिजेत. अडाणी आई बापाच्या पोटी जन्म घेऊन जर बी. ए. झालात तर त्याबद्दल दुरभिमान बाळगु नका. आपल्या कर्तव्याची जाणीव ठेऊन झटुन अभ्यास करा. 

आत्मविश्वासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदाहरणार्थ कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेला पहिलवान दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गेल्यास त्याच्या हातुन काहीतरी होणे शक्य आहे काय ? मी तर नेहमी असे म्हणत असतो, की मी जे करेन ते होईल. अर्थात मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो . 

गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबातील गरीब विद्यार्थ्यांपेक्षा माझी त्यावेळी चांगली मोठी सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही. मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आई बाप भावंडे यांच्या सोबत राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर मी अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटाना तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो, तर तुम्हास आजच्या साधनसामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल? कोणताही मनुष्य सतत दीर्घोद्योगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी उपजु शकत नाही. विद्यार्थी दशेत इंग्लंड मध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास ८ वर्ष लागतात, तो अभ्यास मी २ वर्ष आणि ३ महिन्यात यशस्वीरीत्या पूर्ण केला. हे करण्यासाठी मला २४ तासापैकी २१ तास अभ्यास करावा लागला. जरी आज माझी चाळीशी उलटून गेली असली, तरी मी अजूनही २४ तासांपैकी सारखा १८ तास काम करत असतो. 

दीर्घोद्योग व कष्ट करण्यानेच यश प्राप्ती होते. नुसत्या पदव्या मिळवण्याने काही होणार नाही. आपल्या विद्यार्थ्यांची अशी समजूत झालेली असते, की बी. ए. पदवीधर झाला, की आता पुढे काहीच शिकायचे राहिले नाही; परंतु खरे पाहता  बी. ए. झाल्यावर फार झाले, तर शिक्षकांशिवाय स्वतंत्रपणे अभ्यास करता येईल. म्हणजेच जे शिकायचे आहे ते पुढेच असते.   माणसाने जन्मभरी जरी शिकायचे मनात आणले, तरी विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडघाभर ज्ञानात फार झाले तर जाता येईल. 

विद्याबरोबरच आमच्यात शील असले पाहिजे. शिलाशिवाय विद्या फुकाची आहे; कारण विद्या एक शस्त्र आहे. एखाद्याजवळ विद्येचे शस्त्र असेल व तो शीलवान असेल तर त्योयोगे तो एकाचे संरक्षण करील. तोच इसम जर शीलवान नसेल तर, विद्येच्या शस्त्राने दुसरायचा घात करील. विद्या ही तलवारीसारखी आहे; परंतु तिचे महत्व तिला धारण करणाऱ्यावर अवलंबुन राहील, कारण अडाणी मनुष्य साधारणपने कोणास फसवू शकत नाही. फसवावे कसे हेच त्याला उमगत नाही; परंतु शिकल्या-सावरलेल्या लोकांच्या ठिकाणी कोणास कसे फसवावे व त्या फसवण्यासाठी लागणारा युक्तिवाद असल्याने खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे ते भासवू शकतात. 

लबाडी करण्यास चातुर्य व बुद्धी लागते; परंतु चातुर्य व बुद्धी हिला सदाचाराची अर्थात शिलाची जोड मिळाली, तर लबाडी अगर फसवा फसवी करावीशी वाटणार नाही आणि म्हणुन शिकल्या सवरलेल्या लोकांत शिलाची अत्यंत जरुरी आहे. शिलाशिवाय जर शिकले सवरलेले लोक निपजू लागले, तर त्यांच्या शिक्षणातच समाजाचा व राष्ट्राचा नाश आहे. तेंव्हा शिलाची शिक्षणापेक्षा किती अधिक किंमत आहे, हे तुमच्या ध्यानी आले असेलच आणि म्हणुन प्रत्येक इसमास प्रथम शील असले पाहिजे. 

लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
बालभारती      

No comments:

Post a Comment

हिंदु कोड बिल: लव यु बाबासाहेब!

  यु बाबासाहेब " बाबासाहेब दिल्लीवरून नेहरूंची तार आली आहे ते म्हणतायेत की, हिंदू कोड बिल ला देशात सर्वत्र विरोध सुरू आहे. त्यामुळे हे...