Thursday, April 8, 2021

शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर!

प्रत्येक आंबेडकरी व्यक्तिनी जरुर वाचावे ...खुप गैरसमज आहेत शिवाजी महाराज अणि डॉ बाबासाहेबांन बद्दल.....

मुद्दामपणे शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मराठा समाज ह्या गोष्टी घुसडवण्याचा प्रयत्न कुठलीही अभ्यास नसलेली व्यक्तीच करू शकते . प्रत्येक महापुरुषाची स्वतःची ओळख वेगळीच असते त्या त्या काळाची परिस्थिती त्यातील बदल त्या काळानुरूप महापुरुषाकडून होतात . शिवरायांनी मावळ्यांना एकत्र करून राजकीय बदल केला परंतु त्यांना धार्मिकतेचा डोंब ब्राह्मणी परंपरा असल्याने सामाजिक बदल ते करू शकले नाहीत हे एक सत्य आहे
"1:- महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी "जय शिवरायच्या" घोषणा दिल्या. बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्यागृहाची सुरुवात शिवरायांचे दर्शन घेवून केली."
- --> सदर पहिला मुद्दा पोष्ट करणाऱ्याने टाकलेला आहे .यात सत्याग्रहाची सुरुवात शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेऊन केली हे म्हणणे अगदी अज्ञानी वृत्तीने आणि कुठलीही माहिती न घेता केलेले आहे .महाडचा ऐतिहासिक चवदार तळ्याचा सत्याग्रह *२० मार्च १९२७* ला झाला .अनेक इतिहासाची पाने चाळली अनेक खंड जरी चाळून बघितले तरी बाबासाहेब चवदार तळ्याच्या सत्याग्रहापुर्वी रायगडावर गेलेच नव्हते त्यामुळे रायगडावर जाऊन दर्शन घेऊन सत्याग्रहाची सुरुवात केली हे चुकीचे आहे .बाबासाहेब रायगड किल्ला बघण्यासाठी आपल्या अनेक लोकांसोबत २९ डिसेंबर १९२७ ला गेले होते तेंव्हा रात्री आपल्या अनुयायासोबत मुक्काम केला असता ,बाबासाहेब आंबेडकर यांचावर प्राणघातक हल्ला* करण्यासाठी ५० ते ६० मराठा लोक बंदुकी ,हत्यारे घेऊन गडाच्या दिशेने निघाल्याची बातमी महार कार्यकर्त्यांना कळाली तेंव्हा रात्री गडाच्या पायथ्याशी बाबासाहेबांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर जमल्यामुळे मराठा समाजातील हल्लेखोर तिथे भीतीने येउच शकले नाही .( संदर्भ – भीमराव रामजी आंबेडकर खंड ३ ,ले .चांगदेव भगवानराव खैरमोडे , पा.नं .२१३ ). उलट हा प्रकार होऊन केसरी या वृत्तपत्राने तत्कालीन आमदार नारायण गुंजाळ यांचे बाबासाहेबांच्या वरील आक्षेपार्ह्य भाषण छापून आंबेडकर यांनी शिवाजीच्या सिंहांसणावर बसून सिंहासन भ्रष्ट केले .त्यावर बाबासाहेबांनी नारायण गुंजाळ आणि केसरी चे संपादक नरसोपंत केळकर यांना नोटीस पाठवली .त्याही नंतर "कुलाबा समाचार " या वृत्तपत्राने "डॉ .आंबेडकरांच्या रायगडावरील लीला " असे हेडिंग देऊन आगपाखड केली .यानंतर रा .चित्रे ,सहस्त्रबुद्धे या सारख्या *ब्राह्मणमंडळींनी बाबासाहेबांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी मराठा समाजाला समजवण्यासाठी व्याख्याने दिली.
"2:- बेळगाव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहूने
म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते."
---> माझ्या माहितीप्रमाणे अस कुठलही व्याख्यान बाबासाहेबांनी दिलेलं नाही.
"3:- बाबासाहेब आंबेडकर पत्र लिहतांना पत्राची सुरुवात
"जय शिवराय" लिहून करत होते. महाराष्ट्र शासनाने हि पत्रे प्रकाशित केलेली आहेत."
---> महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेल्या या खंडात एकूण २३६पत्रे आहेत.या ग्रंथाची एकुण पृष्ठ संख्या ४३४ आहे. त्यातल्या नेमक्या कोणत्या पत्राची सुरूवात बाबासाहेबांनी "जय शिवराय" लिहून केलीय हे समजून घ्यायला मला आवडेल.निदान या खंडात तरी असे एकही पत्र नाही. मी बाबासाहेंबांची इतरही प्रकाशित / अप्रकाशित पत्रे पाहिलेली व वाचलेली आहेत. *माझ्या पाहण्यात तरी असे कोणतेही पत्र आलेले नाही. हे खुद्द महाराष्ट्र शासनाच्या "डॉ .बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे" प्रसिध्द करणाऱ्या प्रा .हरी नरके यांच मत आहे* त्यामुळे बाबासाहेबांना कनिष्ठ दाखविण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे .दोन्ही महापुरुष आपापल्या योग्य ठिकाणी आहेत पण वर्णव्यवस्थेत *शूद्र* ठरलेल्या जातीसाठी हा प्रकार करणे अगदी चुकीचा आहे .
"4:- ज्या मनुस्मृती या विषमतावादी ग्रंथामुळे शिवरायांचा राज्याभिषेक ब्राम्हणांनी नाकारला होता.तो मनुस्मृती हा ग्रंथ बाबासाहेबांनी रायगडाच्या पायथ्याशी जाळून शिवरायांच्या अपमानाचा बदला घेतला."
- --> वरील मुद्दाही अगदी हास्यास्पद आहे . शिवरायांच स्वराज्य मावळ्यांना सोबत घेऊन मिळविलेल स्वराज्य राजकीयदृष्ट्या अगदी सत्य आणि आदरणीय असलं तरी त्याकाळी धार्मिक सत्ता जे ठरवील वैदिक परंपरा जे सांगेल तेच केल्याशिवाय त्याला मान्यता नव्हती . याबद्दल खुद्द डॉ .बाबासाहेब आंबेडकर आपल्या Who were Shudras? अर्थात शुद्र पूर्वी कोण होते ? या ग्रंथात पान.क्र. १९५ वर लिहितात कि " *शिवाजी एका स्वतंत्र राज्याचा राज्यकर्ता होता व त्यानी स्वत :ला महाराजा व छत्रपती हे खिताब घेतलेले होते .त्याच्या प्रजेपैकी बरेचसे ब्राम्हण होते .अशी परिस्थिती होती तरीसुद्धा आपला राज्याभिषेक विधी करवून घेण्याच्या बाबतीत शिवाजीला एकाही ब्राम्हणावर सत्ता गाजविता आली नाही .राज्यभिषेकाचा विधी जर कायदेशीर ठरवायचा असेल तर तो ब्राम्हणाच्या हातून झाला पाहिजे ही गोष्ट शिवाजीच्या उदाहरणावरून स्पष्ट झालेली आहे ,म्हणून ते उदाहरण महत्वाचे आहे .राज्याभिषेकाचा विधी जर ब्राम्हणेतराच्या हातून करण्यात आला तर तो विधी सफल होत नसतो .म्हणजे तो वांझ ठरतो ." यावरून ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांना चातुर्वर्ण वैदिक परंपरेत मनुस्मृती नुसार शुद्र ठरविले होते परंतु शिवाजी महाराजांनी काशीच्या गागा भट ला अमाप संपत्ती देऊन हा विधी घडवून आणला होता* एकंदरीत ब्राह्मणी व्यवस्था तोडण्याऐवजी शिवाजी महाराजांनी त्याच व्यवस्थेत राहून त्याच पालन राज्याभिषेकासाठी करणे उचित मानले होते त्यासाठी होणारा विरोध असून पण त्या वर्णव्यवस्थेच्या बेड्या तोडण्याऐवजी त्यात राहणेच उचित समजले होते .हे ही ऐतिहासिक सत्य आहे त्यामुळे वरील मुद्द्यातील राज्यभिषेक आणि मनुस्मृती दहन याचा कसलाच सबंध नव्हता .मनुस्मृती मधील अमानवीय गोष्टीना विरोध म्हणून मनुस्मृतीने दहन केले होते .
"5:- बाबासाहेब म्हणतात संविधान लिहते वेळी मला जास्त ञास झाला नाही कारण छञपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होते.म्हणूनच मी संविधान लिहु शकलो."
- --> वरील मुद्दाही अगदी हास्यास्पद आणि खोडसाळपणाचा आहे . डॉ .बाबासाहेबांनी भारताचे संविधान लिहिताना अत्यंत कष्ट घेतले होते प्रचंड अभ्यास केला होता .५२ देशांच्या घटनांचा अभ्यास तसेच बाबासाहेबांच्या लिखाणात वाचनात बुद्धकालीन इतिहास होता त्यामुळे *बुद्धकालीन गणराज्य (Republican) पद्धती* जी लोकशाही मार्गाने निर्णय घेत असत त्यात अनेक गणराज्य होती लीच्छ्वी सारखी गणराज्ये होती जी लोकशाही पद्धतीने राज्य करीत होती .तसेच भगवान बुद्धाच्या समता ,स्वातंत्र्य ,बंधुत्व ,न्याय या तत्वांचा अंतर्भाव राज्यघटनेत बाबासाहेबांनी केलेला होता . (संदर्भ- घटना समितीतील वादविवाद व भाषणे) त्यामुळे शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते म्हणून संविधान लिहू शकलो ही वाक्ये टाकणे म्हणजे हा मूर्खपणा आणि खोडसाळपणा आहे असे मी समजतो यात *शिवाजी महाराजांचा विरोध अजीबात नाहीच* पण अशा पोष्ट प्रसारित करणाऱ्या मूर्ख लोकांच्या अडाणीपणाची कीव वाटते . *शिवाजी महाराजांचं स्वराज्य राजकीयदृष्ट्या सत्य जरी असलं तरी धार्मिक ,सामाजिक ,शैक्षणिक दृष्ट्या अस्पृश्य ,शुद्रातीशुद्र लोकांना जातीयव्यवस्थेच्या पायथ्याशीच राहावे लागत होते . निवडक प्रतिनिधित्व किल्लेदार ,जहागीरदार महार ,अस्पृश्य लोक जरी असले तरी त्यांच प्रमाण प्रातिनिधिक स्वरुपात होत* शिवाजी महाराजांना राजकीयदृष्ट्या अधिकार जरी असले तरी *सामाजिक ,धार्मिक ,शैक्षणिक बदल करण्याचा अधिकार नव्हता* . अस्पृश्य महार लोक निवडक किल्लेदार ,जहागीरदार जरी असले तरी त्यांना अष्टप्रधानमंडळात कुठे स्थान होत ? अष्टप्रधानात असलेली मंत्रीमंडळात मोरोपंत त्रिंबक पिंगळे , रामचंद्र निलकंठ, अण्णाजीपंत दत्तो, दत्ताजीपंत त्रिंबक, हंबीरराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, निराजीपंत रावजी, रघुनाथराव पंडीत या सारख्या मंडळीमध्ये अस्पृश्य शुद्रांतीशुद्र वर्ग कुठे होता ? आजची पडका सिंहगड किल्ला निरखून पहिला असता "महार टाके" ,"मराठा टाके" असे पिण्याचे पाण्याचे हौद त्याकाळी वेगवेगळ्या स्वरुपात होते त्यामुळे शिवाशिव ,बाट ,अस्पृश्यता त्याकाळी होतीच *एक राजा म्हणून एक आदेश जर शिवरायांनी दिला असता तर एका आदेशाने अस्पृश्यता ,जातीयता नष्ट होऊन समानता निर्माण झाली असती तिथे खरच स्वराज्य समानतेवर असत तर तिथे बाबासाहेबांना हालापेष्टा सहन कराव्या लागल्या नसत्या ,तिथे खरच स्वराज्य समोर असत तर संविधान लिहिण्याची गरजही पडली नसती* .
"6:- बाबासाहेब आंबेडकर लहान असतांना "कृष्णराव. अर्जुन केळुस्कर" गुरुजींनी त्यांना "बुद्ध चरित्र"
भेट दिले होते. या चरित्रामुळे बाबासाहेबांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली. केळुस्कर गुरुजी जन्माने"मराठा" होते."
---> हे जरी खर असलं केळुस्कर गुरुजींनी शालेय जीवनात बाबासाहेबांना सदैव प्रेरणा दिली पण त्यांची जात मराठा होती म्हणून जातीसाठी अशा पोष्ट्द्वारे गवगवा करणे योग्य वाटत नाही . बाबासाहेबांनी पुढे चालून प्रत्येक धर्माचा अभ्यास केला बौद्ध धर्माची निवड केली त्यामुळे मराठा जातीमुळे केळुस्कर श्रेष्ठ ठरले आणि त्यांनी बुद्धचरित्र भेट दिल म्हणून बाबासाहेबांना धर्मांतर करण्याची प्रेरणा मिळाली असे म्हणणे म्हणजे बौद्धिक दिवाळखोरी होय .अस असेल तर केळुस्कर गुरुजींनी अगोदरच बौद्ध धर्म स्वीकारला नसता का?
"7:-छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर "बैरीस्टर" झाल्यावर, त्यांची कोल्हापूर शहरात रथातून मिरवणूक काढून फुले उधळली होती."
---> अगदी बरोबर शाहू महाराजांनी जे बाबासाहेबांना जातीच्या बाहेर जाऊन हेरल होत ते सवर्ण जातीत अडकणारे जातीचाच विचार करू शकतात त्याही काळात शाहू महाराज अस्पृश्यांसाठी सामाजिक बदल करीत होते तेंव्हा आता जे त्यांना जातीत गोठवण्याचा प्रकार करणारे लोक त्यांना *"धेडांचे महारांचे राजे" म्हणून उल्लेख करत .
"8:-राजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी सहाय्य केले होते. सयाजीराव गायकवाड जन्माने मराठा होते....."
---> परत इथे जातीच्या किडलेल्या मनाचा दुर्गंध येतो सयाजीरांवाना जातीच्या बेड्यात अडकवून केवळ ते मराठा होते म्हणून श्रेष्ठ होते आणि त्यांनी बाबासाहेबांना परदेशात जाण्यासाठी सहाय्य केल .मुळात सयाजीराव गायकवाड यांच्या प्रशासनात नियम होता कि जे जे विद्यार्थी निष्णात आहेत ,हुशार आहेत मग ते जातीने ,कुळाने कुणीही असो त्यांना शिक्षणानासाठी आर्थिक सहाय्य करणे अर्थात आजच्या भाषेत बँकाप्रमाणे ऋण लोन देणे आणि त्याची *परतफेड* आपल्या संस्थानामध्ये नोकरीमधून त्या विद्यार्थाचे कर्ज परतफेड घेणे अर्थात बाबासाहेबांनी परदेशातून परत आल्यावर पिता रामजीचा विरोध पत्कारून बडोदा संस्थानात प्रचंड जातिवाद असताना सुद्धा नोकरी करून त्यांचे ऋण फेडले अर्थात रामजी बाबा ना बडोदा मधील हे जातीचे चटके त्रास माहित होता म्हणून ते बाबासाहेबांना जाण्यापासून रोखत होते .तरीसुद्धा बाबासाहेबांनी चटके सहन करून संस्थानाच्या कराराच पालन केल
"9:- बाबासाहेब आंबेडकरांनी शिका आणि संघटीत व्हा ,हा संदेश मराठा बहुजनांना दिला.
"चांभार घराण्यात जन्माला आलेला नेपोलीयन बोनापार्ट अर्ध्या युरोप खंडाचा बादशाह झाला. अरे ज्याच्या आई बापाचा पत्ता नाही तो रेंसमन हेरॉलड ब्रीटन चा पंतप्रधान झाला. लाहनपणी कोळशाच्या खाणीत काम करणारा अब्राहम लिंकन अमेरीकेचा राषट्राध्यक्ष झाला अरे पण मानुसकी नाकारलेल्या समाजात जन्मलेला आपला " भिमराव " या देशाचा शिल्पकार झाला..........! "
- --> सदर मुद्यात बाबासाहेब देशाचे शिल्पकार आहेत हे डोळे लावून सत्य असलं तरी शिकवा ,चेतवा ,संघटित रहा, हा संदेश समस्त भारतीयास दिला त्यालाही विशिष्ट जातीलाच दिला किंवा केवळ मराठा बहुजनांना दिला असा नाही तर भारतातील प्रत्येक नागरिकास दिलेला आहे . युरोप खंडात जातीव्यवस्था किंवा जात नावाची गोष्ट अस्तित्वात नव्हती ना आहे ही जातीयव्यवस्था आणि चातुर्वर्णव्यवस्थेत शुद्राती शुद्र ठरविलेली जात नेपोलीयन बोनापार्ट ला लावणे केवळ हास्यास्पद गोष्ट आहे .
सदर पोष्ट अनेक महिन्यापासून सोशल मिडिया मध्ये फिरतात आणि काही जण अभ्यास न करता इतिहासाची जाण न ठेवता सदर मजकूरच प्रमाण आहे असे मानून तोच खरा इतिहास मानत असतील तर हा निव्वळ अडाणीपणा आहे .इथे बाबासाहेब आंबेडकर ,शाहू महाराज यांना जातीचे लेबल लावून एकमेकांवर अप्रत्यक्षपणे उपकार केलेले आहे अस भासवून जातीचा अंहभाव दाखविणे आणि महापुरुषाचा जय जयकार करणे दोन्हीही विरोधाभासी आहे . बाबासाहेब असो कि शाहूमहाराज त्या त्या काळानुरूप या महापुरुषांनी काळाचा विचार करून पाऊले उचलली आहेत .शिवाजी महाराजांची सामाजिक बदलापेक्षा स्वराज्य मिळवणे अग्रणीय मानले ती त्या काळाची गरज म्हणून आणि बाबासाहेबांनी सामाजिक बदलासह मानवजातीच्या अधिकारासाठी मानवमुक्तीचा लढा दिला तोही मोठा श्रेष्ठच आहे .त्यामुळे सदर अश्या अनेक पोष्ट आहेत ज्यात बाबासाहेबंशी जोडुन दुसर्याला मोठ करण्यात आलेले आहेत म्हणून मला खोट्या आधार नसलेल्या गोष्टींचा गवगवा यांचे खंडण करावे वाटले म्हणून हा सदर लेख .
प्रवीण जाधव

No comments:

Post a Comment

हिंदु कोड बिल: लव यु बाबासाहेब!

  यु बाबासाहेब " बाबासाहेब दिल्लीवरून नेहरूंची तार आली आहे ते म्हणतायेत की, हिंदू कोड बिल ला देशात सर्वत्र विरोध सुरू आहे. त्यामुळे हे...